Uddhav Thackeray on PM Modi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोरदार लक्ष्य करत आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन अमित शाह यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत? असा सवाल अमित शाह यांनी विचारला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
धाराशिवमध्ये प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन अयोध्येला गेलो होतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही आता इतिहासात जाण्याच्या आधी काहीतरी करून जा, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान मोदींना दिला आहे. ते उमरगा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ बोलत होते.
"अल्पसंख्यांक आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा व्यक्ती का घेतला नाही याचा उत्तर द्या आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोला. त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही फक्त विचारायचे आहे की उद्धव ठाकरे अयोध्येला राम मंदिरात का गेले नाहीत. ते राम मंदिर गळत आहे. ते गळायचे थांबले तर मी जाईल. तुम्ही घाईघाईत मंदिराचे उद्घाटन केले. तुमचा फोटो यावा म्हणून तुम्ही राम मंदिराचे घाईघाईत उद्घाटन केले. त्या गळक्या राम मंदिरामध्ये जाऊ नका हे शंकराचार्यांनी सुद्धा सांगितले," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"तुम्ही मला राम मंदिरात जा असं सांगणारे कोण आहात मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन तिथे गेलो. तुम्ही माझ्या माता भगिनींच्या रोजीरोटी साठी दहा वर्षात काय काय केलं हे आधी सांगा. नेहरू आता इतिहासात गेलेत. तुम्ही आता इतिहासात जाण्याच्या आधी काहीतरी करून जा. गळत्या गॅरंटी आम्हाला देऊ नका," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर सावरकरांच्या मुद्द्यावरुन हल्ला चढवला होता. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान देतो. हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत वीर सावरकरांचे कौतुक करून दाखवा. ते करू शकत नाही, कारण त्यांचे सहकारी सावरकरांना विरोध करतात. उद्धव ठाकरे सावरकरांना शूर आणि महान माणूस मानतात, पण राहुल गांधी सावरकरांच्या विरोधात वक्तव्ये करत असतात, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.