- चेतन धनुरे
उस्मानाबाद : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली आहे़ तब्बल ६० उमेदवार आता रिंगणात राहिले असून, सर्वाधिक गर्दी ही तुळजापुरात झाली आहे़ येथून १८ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत़ दरम्यान, तीन मतदारसंघात बंडखोरी झाली असून, यातील दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे़
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत तुळजापुरात होत आहे़ त्यामुळे येथे उमेदवारही सर्वाधिक आहेत़ येथे दोन माजी मंत्र्यांत लढत रंगली आहे़ काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण व भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले आहेत़ याशिवाय, राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांनी बंड पुकारुन ‘वंचित’ची उमेदवारी मिळवली़ तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही बंडखोरी करीत प्रहार पक्षाकडून शड्डू ठोकला आहे़ मनसेचे प्रशांत नवगिरेही नशीब आजमावत आहेत़ मधुकरराव चव्हाण हे या मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राखून आहेत़ तर भाजपनेही यावेळी राणा पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलविण्यासाठी कंबर कसली आहे़
उस्मानाबादेत रंगत वाढलीउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ़संदीप तांबारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ दरम्यान, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे व राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला आहे़ त्यामुळे येथेही रंगत निर्माण झाली आहे़ परंडा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा़ तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश कांबळे व अन्य ७ जणांत लढत रंगली आहे़ सुरेश कांबळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत वंचितची उमेदवारी पदरी पाडून घेतली आहे़ याशिवाय, जनता दलाचे अॅड़रेवण भोसले, कॅ़संकेत चेडे यांनी दंड थोपटल्याने चुरस वाढली आहे़ प्रा़तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री आहेत़ तर राहुल मोटे हे सलग तिसºयांदा विजयी झाले आहेत़ त्यामुळे परंड्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़
उमरगा मतदारसंघ बंडखोरीला अपवाद उमरगा मतदारसंघात बंडखोरीला अपवाद ठरला आहे़ येथे शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले, काँग्रेसचे दिलीप भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे रमाकांत गायकवाड, मनसेचे जालिंदर कोकणे यांच्यासह इतर सहा जण रिंगणात आहेत़ विद्यमान आमदार चौगुले हे या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झाले आहेत़ त्यांना रोखण्यासाठी विरोधकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे निश्चित़