कळंब शहरातील माता रमाईनगर, सावरगाव पुनर्वसन भागात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती इतर मागासवर्गीय कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. मागील २५ वर्षांपासून ही कुटुंबे पत्र्याचे शेड मारून या ठिकाणीच राहत आहेत. हे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे. तसेच सध्या राहत असलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकूल आवास ग्रामीण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात यावी, या मागणीसाठी कळंब नगर परिषद, तहसील कार्यालयासमोर आंदोलने, माेर्चा, उपोषण, ठिय्या आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलने तसेच निवेदनही देण्यात येत आहेत.
मात्र, तरीही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसावे लागण्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना सरकारी नियमानुसार नियमानुकूल करून घेऊन, कुटुंबांना प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हनुमंत डोंगरे, वसंत देडे, समाधान डोंगरे, राजुबाई डोंगरे, जयश्री कांबळे, अर्चना ननावरे आदी उपस्थित होते.