Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. शरद पवार यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि राज्यातील सत्ता बदलणार असल्याचा निर्धार केला.
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...
खासदार शरद पवार यांनी आज सकाळी परांडामध्ये जाहीर सभा घेतली. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोकांनी आमची साथ सोडली. भाजपाच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो, पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो, एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभीमानी आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे.
'सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
यावेळी शरद पवार म्हणाले, ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असा निर्धार खासदार शरद पवार यांनी यावेळी केला.
परांडा विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे तर महायुतीकडून शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात संभा घेतली, तर लगेच शरद पवार यांनी सभा घेतली आहे. यामुळे या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू आहे.