उस्मानाबादेत महाविकास आघाडीला धक्का; जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदावर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 03:25 PM2020-01-08T15:25:11+5:302020-01-08T15:29:33+5:30
अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्ष पदी धनंजय सावंत यांची वर्णी
उस्मानाबाद - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. हेच समीकरण जिल्हा परिषदेत आकारास येत असतानाच नाट्यमय घडामोडी घडल्या. सेना आमदार तानाजी सावंत यांच्या गटाने केलेल्या मदतीमुळे महाविकास आघडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. अध्यक्षपदी राष्ट्रवादीतील भाजपा समर्थक अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची वर्णी लागली आहे.
सावंतांनी ताणला सेनेवरच बाण, जिल्हा परिषदेत भाजपाला मतदान
जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीसातिच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. तोवर महाविकास आघाडीत सर्व आलबेल होते. असे असतानाच सेना आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर एकाच गाडीतून जिल्हा परिषद आवारात दाखल झाले. आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत मिळाले. यानंतर काही क्षणातच भाजपा आमदार पाटील गटाच्या अस्मिता कांबळे यांचा अध्यक्ष पदासाठी तर सेनेचे आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी सेनेच्या अंजली शेरखाने यांची तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सरली असता निवडणूक रिंगणात एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर
यावेळी भाजपा आमदार राणा पाटील गटाच्या कांबळे यांना 30 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शेरखाने यांना 23 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कांबळे यांना विजयी घोषित केले. यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान झाले. आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनाही 30 मते मिळाली. तर काँग्रेसचे आष्टे यांना 23 मते मिळाली. त्यामुळे सात मतांनी सावंत विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. निवडीनंतर आमदार सावंत आणि आमदार पाटील समर्थकांनी जल्लोष केला.
सावंतांची नाराजी भोवली...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने आमदार प्रा. तानाजी सावंत नाराज आहेत. त्यांच्या याच नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. त्यांच्या गटाच्या सदस्यांनी केलेल्या मदतीमुळे अध्यक्ष पदाच्या उमेदवार भाजप समर्थक अस्मिता कांबळे यांचा विजय सोपा झाला. तर सेनेच्या उमेदवार शेरखाने यांना पराभव पत्करावा लागला.