कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते, असे थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह, अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळविणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. अनेक ठिकाणच्या शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, डॉ. दामोदर पतंगे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत मोरे, जि.प. माजी सभापती अभयराजे चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, शिवसेनेचे किरण गायकवाड आदींंच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. हे शिबिर श्रीकृष्ण रक्तपेढीच्या सहकार्याने होत असून, यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
यांना करता येईल रक्तदान...
१८ ते ६० वर्ष वयोगटांतील व्यक्ती
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.