लोहारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले. परिणामी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही बाब लक्षात घेत ‘लोकमत’च्या वतीने १५ जुलै रोजी लोहारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील भारतमाता मंदिरात हे शिबिर होणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटना, शिक्षणसंस्था, मित्रमंडळे यांच्यासह मान्यवरांनी केले आहे.
लोकमत, आर्ट ऑफ लिव्हिंग, कै. भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, जनकल्याण समिती व गया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरात शिक्षक संघ, शिक्षक समिती, कै. वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय, ओबीसी कर्मचारी महासंघ, लोहारा तालुका तेली समाज संघटना, कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, दयानंद गिरी मित्रमंडळ, रमाकांत गायकवाड विचार मंच, जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा लोहारा, जिजाऊ ब्रिगेड, बसवेश्वर गणेश मंडळ, लोहारा तालुका डॉक्टर असोसिएशन,न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुद्देशीय सामजिक संस्था, एजी युवा बहुद्देशीय सामाजिक संस्था, बालगणेश सेवा दल मंडळ, दत्तगणेश मंडळ, वीरशैव ककय्या गणेश मंडळ, निसर्ग संवर्धन संस्था, टायगर ग्रुप, मिलाफ ग्रुप, शिव मित्रमंडळ, विश्वजन आरोग्य सेवा समिती, तालुका मेडिकल असोसिएशन आदी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविणार आहेत.
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते, असे थायलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मतांसह अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळविणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. अशा परीस्थितीत रुग्णालय प्रशासनासह रुग्णांच्या नातेवाइकांनादेखील मोठी धावपळ करावी लागते. त्यामुळेच या सर्वांना जीवनदान देण्यासाठी आपण सर्वानी एकत्रिकपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. हे शिबिर सह्याद्री रक्तपेढीच्या सहकार्याने होत असून, यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी, असे आवाहन यानिमित्त करण्यात येत आहे.
यांना करता येईल रक्तदान
१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.