तुळजापूर : आज नवरात्रौत्सवातील आठवी माळेनिमित्त दुर्गाअष्टमीचे औचित्य साधून श्री तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडली. या आगळ्यावेगळ्या पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेऊन ‘आई राजा उदे उदे’चा गजर केला.
तत्पूर्वी रात्री एक वाजता चरणतीर्थ हा नित्योपचार धार्मिक विधी पार पडला. यानंतर भाविकांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पहाटे सहा वाजता नित्योपचार अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. अभिषेक संपल्यानंतर भोपे पुजारी शशिकांत पाटील यांनी देवीस नैवद्य दाखवून धूपारती व अंगारा हे नियमित विधी पार पडले. त्यानंतर भोपे पुजारी आकाश पाटील यांनी गाभाºयातील घट-कलशाचे पूजन करून त्यास आठवी पुष्पमाळ घालून दर्शन घेतले.
यादरम्यान भोपे पुजारी सचिन परमेश्वर, संजय सोंजी, अतुल मलबा, आकाश पाटील, प्रशांत सोंजी यांनी श्री तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी ही विशेष अलंकार महापूजा बांधली. या पूजेत श्री तुळजाभवानी आक्रमक रूपधारण करून हातात त्रिशूळ घेऊन महिषासुराच्या छातीत मारून त्याचा वध केल्याचे दाखविण्यात आले आहे. यावेळी श्री तुळजाभवानीच्या उजव्या बाजूला युद्धातील वाहन सिंह तर देवीच्या पायाखाली महिषासुराचे डोके प्रतिकृती म्हणून दाखविण्यात आलेले आहे. या अशा आगळ्यावेगळ्या शेवटच्या महापूजाचे हजारो देवी भाविकांनी पायी येऊन दर्शन घेतले. यानंतर दुपारी होम यज्ञास अग्नी देऊन हवनासाठी प्रज्वलित करण्यात आले.
अख्यायिकाकुकर नावाचा दैत्य हा देवदेवतांना व मानवांना त्रास देत होता. यावेळी सर्व देवतांनी देवीपार्वतीला विनवणी केली व यापासून रक्षण करण्याची मागणी केली. यावेळी सर्व देवदेवतांनी पार्वतीस शक्ती देऊन सिंह या वाहनासह तुळजाभवानीचा अवतार घेऊन महिषासूररुपी कुकर दैत्याचा वध केला व महिषासूररुपी मुंडके वेगळे करून पायाखाली चिरडले तसेच त्रिशुळाने छातीवर वार करून त्याचा वध केला. या कुकरदैत्याच्या वधामुळे सर्व देवदेवतांची व मानवांची या महिषासुरापासून सुटका झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.