मागणी -राजेश्वर पाटील यांनी दिले निवेदन
कळंब : शिराढोण, गोविंदपूर या कळंब तालुक्यातील महसूल मंडलात पावसाने वीस दिवसांपासून ओढ दिली आहे. यामुळे सोयाबीनचे पीक वाळून चालले आहे. प्रशासनाने याचे पंचनामे करत शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील यांनी केली आहे.
तालुक्यातील शिराढोण, गोविंदपूर महसूल मंडलातील शिराढोण, गोविंदपूर, नायगाव, निपानी, जायफळ, रांजणी, एकूरका, जवळा, कोथळा, हिंगणगाव आदी गावात पावसाने ओढ दिली आहे. या भागातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिली आहे. ज्या काळात पिकाला पाण्याची गरज असते, त्याच काळात तब्बल वीस दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. परिणामी हलक्या जमिनीतील पिके तर वाया गेली आहेत. शिवाय इतर पिकेही माना टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याचा विचार करत शिराढोण पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील यांनी काही शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर कळंब येथे शिष्टमंडळासह उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांची भेट घेऊन गावपातळीवर पावासाने होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेचे नेते गोविंद वाघे, कुमार पाटील, किरण सहाने, संपत सहाणे आदी उपस्थित होते.