उमरगा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. असे असतानाही मागील दोन दिवसांपासून रेमडेसिवीर औषधाची कमतरता आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने हे औषध उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. ज्ञानराज चाैगुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रविवारी केली.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात व औषधी दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपलेला आहे . इंजेक्शनकरिता रुग्णांचे नातेवाईक मोठी धावपळ करीत आहेत. यामुळे रुग्ण गंभीर होत आहेत. कोरोना झालेल्या रुग्णास रेमडेसिवीर इंजेक्शनचे पाच ते सहा डोस द्यावे लागतात. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. हे चित्र लक्षात घेता तातडीने रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. चाैगुले यांनी केली आहे.