धाराशिव : शेतरस्ता खुला करण्यात यावा, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील शेतकरी सोमवारपासून जिल्हाकचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
माळकरंजा येथील महादेव तूपसौंदरे राजकुमार तूपसौंदरे, सुखदेव मुळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी शेतरस्ता होता. मात्र, शेतरस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करता येत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने सोमवारी ग्रामस्थ जिल्हाकचेरी गाठून उपोषणास बसले आहेत.
यावेळी उपोषणकर्ते शेतकरी म्हणाले की, शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेले आहे. मात्र, शेतरस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. याच परिसरातील स्मशानभूमीच्या जागेवर बंधारा बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. ते अद्याप काढण्यात आलेले नाही. प्रशासनाने शेतरस्ता खुला करून स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.