धाराशिव : दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी पाेलिस असल्याची बतावणी करुन एकाच्या साेन्याच्या अंगठ्या दिशाभूल करत पळविल्याची घटना पवारवाडी शिवारात घडली. याबाबत धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, हरी गोविंद माळी (वय ५०, रा. पळसप ता. जि. धाराशिव) हे सकाळी ११:३० वाजता पवारवाडी शिवारातून दुचाकीवरुन (एम.एच. २५ ए.वाय. ९५७८) प्रवास करत होते. दरम्यान, तिघा अज्ञातांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येत फिर्यादीला दुचाकीसह अडविले. आम्ही पोलिस आहाेत, अशी बतावणी करुन फिर्यादीच्या बोटातील अंगठ्या काढायला सांगितले. त्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्यासाठी पुडीत बांधतो, असे सांगून त्यांच्याकडील अंगठ्या घेवून कागदात न ठेवता कागदामध्ये लहान दगड ठेवून सोन्याच्या अंगठ्या घेऊन पसार झाले. यावेळी तिघांनी फिर्यादी हरी माळी यांची फसवणूक केली. याबाबत धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.