मुरूम : शहरातील टपाल कार्यालयातील आधार लिंक व नोंदणीची कामे संगणक ऑपरेटरअभावी मागील तीन वर्षांपासून बंद आहेत. तसेच परिसरातील सात गावांतील कामाचा भार केवळ एकाच महिला पोस्ट मास्तराच्या खांद्यावर पडल्याने दैनंदिन कामकाजावरदेखील मोठा परिणाम होत आहे.
शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षांपूर्वी एका खासगी एजन्सीमार्फत आधार नोंदणीची कामे केली जात होती. त्यानंतर पोस्ट खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयामुळे एजन्सीचे काम बंद करून आधारचे काम पोस्ट खात्याने स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मुरूम पोस्ट कार्यालयातील आधारचे काम बंद पडले आहे. कार्यालयात संगणक ऑपरेटर नसल्यामुळे आणि कार्यालयात असलेल्या एकमेव पोस्ट मास्तरवर कार्यालयाचा संपूर्ण कामाचा ताण पडत असल्यामुळे आधारचे काम करण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोस्ट कार्यालयात आधार लिंक तसेच आधारवरील नाव दुरुस्ती व आधारबाबतची इतर कामे करवून घेण्यासाठी नागरिकांची तीन वर्षांपासून मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आधारच्या कामासाठी नव्याने संगणक ऑपरेटरची नियुक्ती करावी अथवा खासगी एजन्सीला काम द्यावे व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट....
नेटवर्कचीही येतेय अडचण
या पोस्ट ऑफिसअंतर्गत मुरूम शहरासह आलूर, बेळंब, भुसणी, भुयार चिंचोली, केसरजवळगा, सुंदरवाडी अशा सात गावांतील पोस्टची कामे एकाच पोस्ट मास्तरवर अवलंबून आहेत. तसेच मोबाईल नेटवर्क नेहमीच विस्कळीत होत असल्याने दिवसभरातील नागरिकांची इतर कामेदेखील खोळंबली जात आहेत. कार्यालयीन कामाचा भार पाहता आधारच्या कामासाठी नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
फोटोओळी : मुरूम शहरातील टपाल कार्यालयात कामानिमित्त रांगेत थांबलेले नागरिक.