कळंब - लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील लोकजीवनावर व कळंब तालुक्यातील १९ गावांतील शेतीला वरदान ठरणाऱ्या मांजरा प्रकल्पाची वाटचाल 'ओव्हर फ्लो'च्या दिशेने सुरू आहे. मागच्या १० दिवसांत १०० द.ल.घ.मी. पाण्याची आवक झाल्याने प्रकल्पाचा साठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.
कळंब तालुक्यातील दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या शिवेवर मांजरा प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. उस्मानाबाद व बीड जिल्ह्याची सीमा बनून प्रवाही होणाऱ्या मांजरा नदीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा कळंब तालुक्यासह लातूर तालुका व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज तालुक्यातील अनेक गावांतील शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, अंबाजोगाई, धारूर, केज, मुरुड या शहरांसह अनेक गावांची तहान भागविण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. याच कारणामुळे मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाकडे, बीड, केज, कळंब व वाशी तालुक्यांतून प्रवाही होणाऱ्या मांजरा नदीच्या पात्राकडे लातूर, बीड व उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांस लगत असलेल्या भागात निर्मिलेल्या मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्याकडे तिन्ही जिल्ह्यांतील लोकांचे लक्ष लागलेले असते. असा हा शेतकरी व नागरी लोकसंख्येच्या संदर्भाने महत्त्वाचा असलेला प्रकल्प पाऊस-पाण्याच्या बाबतीत मागच्या तीन वर्षांपासून समाधानकारक स्थितीत आहे. यामुळेच पावसाळ्याच्या आरंभी कधी नव्हे ते मृतसाठ्याच्या वर धरणात पाणीसाठा होता. यातच जुलैमध्ये पुन्हा पाण्याचा नवा येवा झाला. यामुळे प्रकल्पावर निर्भर असलेल्या भागातील लोकांच्या आनंदात अधिकच भर पडली.
चौकट...
शहरासह अनेक गावांत उत्साह संचारला...
मांजरा प्रकल्पातून कळंब शहारास पाणीपुरवठा केला जातो. शहर व लगतच्या डिकसळ अशा ४० हजार लोकांची तहान हा प्रकल्प भागवतो. याशिवाय पाणलोट व लाभक्षेत्रातील कळंब, खडकी, लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, करंजकल्ला, शिराढोण, आवाड शिरपुरा, हिंगणगाव, कोथळा, घारगाव, रांजणी, ताडगाव, सौंदना अंबा, वाकडी ई, आदी वीसएक गावांतील शेतीला मांजराचे पाणी वरदान ठरत असल्याने सद्य:स्थितीत पाणीसाठ्यात झालेल्या वृद्धीमुळे उत्साह संचारला आहे.
दहा दिवसांत शंभर द.ल.घ.मी. साठा वाढला...
यंदा, मांजरा प्रकल्पात जूनमध्ये ८० द.ल.घ.मी.च्या आसपास पाणीसाठा होता. यात २३ जुलै रोजी दखलपात्र आवक झाली. यानंतर प्रवाही झालेल्या मांजरा नदीमुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत होती. यात एक ऑगस्टला ८६ द.ल.घ.मी. साठा असलेल्या प्रकल्पात महिनाभरात म्हणजेच एक सप्टेंबरपर्यंत केवळ ६ द.ल.घ.मी.ची वाढ होऊन साठा ९३ द.ल.घ.मी.वर पोहोचला. यानंतर पावसात वाढ झाली. यामुळे पुढील काळात दखलपात्र येवा झाला. एक ते १० सप्टेंबर या १० दिवसांत तब्बल १०० द.ल.घ.मी. साठा वाढला. यामुळे आजच्या स्थितीत २२४. ०९३ द.ल.घ.मी. क्षमतेच्या मांजरा प्रकल्पात २०० द.ल.घ.मी. साठा होऊन टक्केवारीत प्रकल्प ९० टक्के पाणीसाठ्यावर पोहोचला आहे.
२२ जुलै १.७ द.ल.घ.मी. आवक
१ ऑगस्ट ८६ द.ल.घ.मी.
१ सप्टेंबर ९३ द.ल.घ.मी.
१० सप्टेंबर २००