उस्मानाबाद : डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, जे विद्यार्थी यामध्ये परिश्रम घेतील, त्यांना नोकरीमध्ये उच्च पॅकेज सहज उपलब्ध होते, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि अकॅडमिक डी. प्रा. डॉ. डी. डी. दाते यांनी दिली.
येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाने ‘डिझाइन ॲण्ड ड्रॉइंग ऑफ मेकॅनिकल इलेमेंट्स’ या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील एकूण १५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी प्रा. उमेशचंद्र जाधव यांनी डिझाइन बेसिक्स व कॅटिया सॉफ्टवेअर शिकवले. दुसऱ्या दिवशी प्रा. प्रशांत जैन यांनी ‘सॉलिडएज’ या सॉफ्टवेअरविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी उद्योगांमधील डिझाइन, सॉफ्टवेअरचे वाढते महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यांत्रिकी विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.