नंदगाव : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील रॅम्प, लोखंडी ग्रीलसह दरवाजा, पाण्याची टाकी, पाइपलाइन आदी कामे पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ अभियंता बिराजदार यांनी संबंधित कंत्राटदारास यापूर्वीच सूचना केल्या आहेत; परंतु कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कामे अजूनही अर्धवट आहेत.
संबंधित कंत्राटदाराने रॅम्प बसविले असले तरी त्यातही वापरलेल्या आडव्या पाइपला एलबो बसविले नाहीत. त्यामुळे पाइप कटिंग केलेले असून, धारदार पाइप उघडेच आहे. यामुळे चढताना हाताला लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पायऱ्यावरील दरवाजा, पाण्याची टाकी, स्वच्छतागृहातील पाइप फिटिंग, आदी कामे अद्याप अपूर्णच आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले की, संबंधित ठेकेदाराने जवळपास दीड वर्षापासून हे काम रेंगाळत ठेवले आहे. वारंवार सूचना करूनही टाळाटाळ केली जात आहे. वरिष्ठ अभियंता बिराजदार यांच्या सूचनेनुसार हे काम पूर्ण करून घेतले जाणार असून, दिरंगाईबद्दल दररोज ३०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करूनच त्यांचे बिल काढले जाईल.