धाराशिव - पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. तुम्हाला पुराव्याचा आधार हवा होता ना? तर आता पाच हजार पुरावे मिळालेत की. त्यामुळे आता मराठ्यांना सरसकट आरक्षण द्याच, तेही पन्नास टक्क्यांच्या आतच अशी मागणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी कळंब येथे केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवली येथे १७ दिवस प्राणांतिक उपोषण केलेल्या मनोज जारांगे यांनी सरकारला ३० दिवसाचा 'अल्टीमेट' देत आंदोलन मागे घेतले होते. ही घटीका आता समीप आली आहे. या अनुषंगाने १४ ऑक्टोबरला अंतरवाली येथे सभा आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जरंगे पाटील यांचा ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू आहे. यानिमित्तानं कळंब येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले, २९ ऑगस्टला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला,तो आजपर्यंत कायम सुरू आहे. आंदोलन शांततेत सुरू होतं, तिसरा दिवस असताना अचानक ६५ ते ९० वर्षांच्या मातामाऊली, तान्ह्या बाळास मांडीवर घेवुन बसलेल्या आयाबायांवर प्राणघातक हल्ला झाला. रक्तबंबाळ केलं, सतरा सतरा टाके पडले,अनेक छर्रे शरीरात आरपार झाले. याचे कारण अद्यापही समजलं नाही. आरक्षण मागत होतोत, काय गुन्हा अन् पाप केलं, असा निष्ठूर हल्ला केला? याचे सरकारने अद्याप उत्तर दिले नाही.
चार दिवस काय, चाळीस दिवस दिले ... सरकारने चर्चा सुरू केली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, पन्नास टक्क्यांच्या आत लोकसंख्येप्रमाणे मराठा स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिले तरी चालेल या प्रमुख मागण्या. यासाठी चार दिवस वेळ दिला,तो मान्य केला नाही. अध्यादेशासाठी कायद्याने सिद्ध व्हावे लागेल असे सांगण्यात आले. इतरांना व्यवसायामुळे आरक्षण. मग गायकवाड अहवाल आमच्या बाजुने होता, मराठा शेती करतो, मराठा कुणबी एकच. तरी मराठ्यांना आरक्षण नाही. चार दिवसात हे शक्य नाही असं सांगत पुन्हा चर्चा झाल्या. सत्ताधारी, विरोधक एकत्र बसत महिन्याची वेळ मागितली. मी, अधिकचं दहा दिवस बोनस देत चाळीस दिवस दिले. समिती झाली, ती मुंबई, हैद्राबाद, संभाजीनगर अशी विमानाने धावतेय. पाच हजार पुरावे मिळालेत. आता अडलयं कुठं. यामुळे आता आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, असे जारांगे पाटील यांनी सांगितले.
दुपारी 2 ची सभा रात्री १० वाजता...दुपारी चारची सभा रात्री दहा वाजता सुरू झाली. तोपर्यंत मोठा जनसागर ताटकळत बसलेला होता. यावर बोलताना जारांगे पाटील यांनी येण्यासाठी उशीर झाला. उपाशी ठेवलं, मनापासून माफी मागतो. यापेक्षा जास्त देण्याकडे माझ्याकडे काहीच नाही. गावागावातील माणसं गाडी पुढं जावू देईनात. डावलून पुढं पाय ओढेना असे बोलुन खंत व्यक्त केली.
मंत्री, मातब्बरांची शिष्टाई, नियत ढळू दिली नाही... आंदोलना दरम्यान मंत्री, अधिकारी, मातब्बर भेटत होते. हेलपाटे मारत होते, शिष्टाई करत आश्वासन देत होते. मात्र, मंत्र्याने खांद्यावर हात टाकला तरी मी एक इंचभरही नियत ढळू दिली नाही. मरेपर्यंत जातीशी गद्दारी करणार नाही. जातीवर आजवर अन्याय झाला, आता हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय. पत्नी, वडील , लेकरांना सांगून आलोय. आलो तर आरक्षण घेवूनच, नाही तर नाही. यामुळे माझी कोणी काळजी करू नका. लढ्याशी प्रामाणिक आहे, त्यामुळेच समाज एकजूट होवून मागे उभा आहे .मला,आरक्षणाशिवाय दुसरं काही कळत नाही. यामुळे १४ तारखेला अंतरवाली येथे मोठ्यासंख्येने उपस्थित रहा, असे जरंगे पाटील यांनी सांगितले.