उमरगा (जि. धाराशिव) : ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे’’, असे म्हणत उमरगा तालुक्यातील माडज येथील एका तीस वर्षीय तरूणाने बुधवारी गावातीलच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली हाेती. यानंतर आक्रमक झालेल्या काही तरूणांनी गुरूवारी शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्यावर कार पेटवून देत निषेध नाेंदविला. त्यामुळे शहरासह परिसरात दिवसभर तणावपूर्ण शांतता हाेती.
मराठा आरक्षणासाठी किसन माने या तरूणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर गुरूवारी सकाळी मृतदेह गावातून उमरगा शहरात आणण्यात आला. यावेळी हजाराेच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरले हाेते. ‘‘किसन माने अमर रहे, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’’, यासारख्या घाेषणा देत संतप्त तरूणांनी शहरातून श्रध्दांजली रॅली काढली. यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली असता, श्रध्दांजली वाहन्यासाठी हा मृतदेह उपविभागी अधिकारी कार्यालयात नेण्यात आला. ताेच कार्यालयासमाेरीलच मुख्य मार्गावर काही तरूणांनी कार पेटवून दिली. त्यामुळे परिसरात माेठा गाेंधळ उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून येथील श्रध्दांजलीचा कार्यक्रम रद्द करून मृतदेह गावी नेण्यात आला. साधारपणे दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.