- मधुकर राऊत
तेरखेडा (जि.उस्मानाबाद) : मराठवाड्याची शिवाकाशी समजल्या जाणाऱ्या तेरखेडाच्या फटाका उद्योगाला यंदा जबर झळ बसली आहे. आधी कोरोनामुळे ७ महिने उत्पादन ठप्प होते. आता ठिकठिकाणी बंदीचे निर्णय होत असल्याने संभ्रमित व्यापाऱ्यांनी ३० टक्केही मागणी नोंदवलेली नाही.
तेरखेडा हे फटाका उत्पादनासाठी राज्यभर परिचित आहे. येथे फटाके निर्मितीचे १८ कारखाने आहेत. पावसाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर येथे फटाका निर्मिती सुरू असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ७ महिने उत्पादन प्रक्रिया ठप्प होती. दिवाळीच्या तोंडावर परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्यांत शक्य तितके उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न कारखानदारांनी केला. तरीही दरवर्षीपेक्षा यंदा ३० टक्केच उत्पादन करता आले. दरम्यान, आता अनलॉकमुळे फटाक्यांना उठाव येईल, अशी अपेक्षा कारखानदारांना होती. मात्र, मध्येच फटाकाबंदीचा निर्णय ठिकठिकाणी घेण्यात येत असल्याने अद्याप व्यापारी, विक्रेत्यांकडून पुरेशी मागणीच आली नाही. त्यामुळे आता फटाके पडूनच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फटाकेबंदीबाबत संभ्रमकोरोनामुळे फटाके निर्मितीवर मर्यादा आल्या. दोन महिनेच मिळाले. त्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले. आता फटाके बाजारात आले तरी ग्राहक नाहीत. शिवाय, फटाकेबंदीबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारीही मागणीसाठी पुढे येईनात. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. - फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका कारखाना असोसिएशन
रोजगारावर मर्यादा आलीकोरोना महामारीमुळे ७ महिने कारखाने बंद असल्याने रोजगार बुडाला. उसनवारीवर संसार चालवले. आता मागणी कमी असल्याने उत्पादनही कमी केले जात आहे. त्यामुळे पुन्हा रोजगारावर मर्यादा आली आहे. दुसरीकडेही कोठे सध्या कामे नाहीत. - समाधान सरवदे, फटाका कामगार