धाराशिव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कामगारांच्या वतीने सोमवारी हाती थाळीपळी घेऊन जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर थाळीवर पळी वाजवून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला. माेर्चात सहभागी झालेल्या कामगारांनी थाळी पळी वाजवून आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असलेली सेंट्रल किचन प्रणाली बंद करा, केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना १८००० मानधन द्या, विनाकारण विनाचौकशी कामगारांना कामावरून कमी करू नका, १० महिनेऐवजी १२ महिने शालेय पोषण आहार कामगारांना मानधन द्या, १ एप्रिलपासून झालेली मानधन वाढ कामगारांच्या खात्यात ताबडतोब जमा करावी, पूरक आहार बिल ऑनलाईन न करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करावे, बिल शिक्षकांच्या पगारातून कपात करून कामगारांना वाटप करावे, ज्या कामगारांचे वय ६५ आहे, अशा कामगारांना सेवा पुरती म्हणून १ लाख रुपये देण्यात यावे, शिवाय, त्यांना ३ हजार रुपये दरमहा पेन्शन सुरू करण्यात यावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या होत्या. आंदोलनात कुसुम देशमुख, सुरेश धायगुडे, विष्णू शिंदे, बाळासाहेब निकम, सोनाली साळुंखे, सीमा येलदरे, मनीषा धामणे, दीपाली देशमुख, मनीषा पवार, निर्मला पवार, अलका भोसले आदी शालेय पोषण आहार कामगार सहभागी झाले होते.