उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने, जिल्हा प्रशासनाने पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी जिल्ह्याभरातील मंगल कार्यालयांत अचानक स्पॉट व्हिजिट करून नियमांचे पालन होतेय का, याची चाचपणी करण्यात आली.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बऱ्यापैकी सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखण्याचे नियम कायम आहेत, तरीही सवलतींचा गैरफायदा घेत, नागरिकांनी कोणतीही खबरदारी न घेता, लग्नसोहळे, मेळावे, कार्यक्रमांना गर्दी केली. परिणामी, आता पुन्हा कोरोनाचा जोर वाढीस लागला आहे. दररोज रुग्ण आढळून येण्याची सरासरी वाढली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा निर्बंध कडक करण्याची पावले उचलली गेली आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नागरिकांना आवाहन करतानाच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे, शिवाय सर्व यंत्रणांना सतर्क राहून दुसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याचा एक भाग म्हणून सोमवारी जिल्ह्याभरातील सर्वच उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी अचानक आपापल्या भागातील मंगल कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली, तसेच वर्दळ असणाऱ्या आस्थापनांनाही त्यांनी भेटी देत, खबरदारीबाबत ताकीद दिली. पुढच्या वेळी नियमांचा भंग झाल्याचे दिसून आल्यास, थेड दंड किंवा गुन्हा दाखल करण्याची तंबीही नियम न पाळणाऱ्या आस्थापनांना सोमवारी देण्यात आली आहे.