उमरगा : शहरातील पतंगे रस्त्याचे रखडलेले काम इस्टीमेट नुसार तात्काळ सुरू करावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नालीचे काम करावे, यासाठी या भागातील रहिवाशाननी मंगळवारी नगराध्यक्षाना घेराव घातला.
पतंगे रस्त्याच्या डांबरीकरणाची निविदा प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी झाली असून, अजूनही हे काम रेंगाळले आहे. या कामाची मुदत संपल्याने नगर परिषदेने मागासवर्गीय वस्ती सुधार योजनेतून हे काम करण्याचे कार्यरंभ व मुदतवाढीचे आदेश २३ डिसेंबर २०२० रोजी काढले. त्यानंतर संबंधित गुत्तेदाराने इस्टीमेटनुसार रस्ता न खोदता पूर्वीच्याच रस्त्यावर खडी व मुरूम टाकून दबई केली आहे. याला आता महिन्याचा कालावधी होत असून, पुढील डांबरीकरण करणे या गुत्तेदाराने थांबविले आहे. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी नगरपालिकेत नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात खोलीत घेराव घालून समस्या मांडली.
यावेळी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी रस्त्याचे डांबरीकरण लवकरच सुरू होईल व रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नालीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाला असून, लवकरच त्याचीही निविदप्रक्रिया करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनावर बिरजू कुडुंबले, धनराज गिरी, चित्तरंजन चौगुले, किरण रामतीर्थे, शरद पाटील, शिवप्रसाद लड्डा, अशोक माणिकवार, उद्धव साठे, संजय सोनकावडे, पंकज मोरे, अजिंक्य गाढवे, आकाश चव्हाण आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.