उस्मानाबाद जिल्ह्याची आरोग्य सेवा सोलापूर, लातूरच्या तुलनेत तितकी सक्षम झालेली नाही. अनेक क्रिटीकल रुग्णांना लातूर, सोलापूरला जावे लागत असते. आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी, यासाठी उस्मानाबादेत वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, अशी अनेक वर्षांपासून जिल्हावासीयांकडून मागणीही होत होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाविद्यालयाबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. जिल्हा रुग्णालयाकडे एकूण पावणे चाेवीस एकर जागा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयालगतच पशुसंवर्धन विभागाची २ एकर ५ गुंठे जमीन वापराविना पडून होती. ही जमीन हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देत राहिली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात यंत्र सामग्री वाढली असून, आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे; मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजत घोंगडे कायम राहिले. नवीन वर्षात तरी या विषयास गती मिळून लवकरच महाविद्यालय सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
कोट...
वैद्यकीय महाविद्यालयाबाबत प्रस्ताव पाठविला आहे. महाविद्यालयासाठी जागा निश्चित झालेली आहे. मान्यता मिळाली नाही, शासनस्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीला जाणार आहे. त्या ठिकाणाहून मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल.
डॉ. धनंजय पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक.