उस्मानाबाद : राज्यातील वैद्यकीय परीक्षेबाबत आता कोणताही संभ्रम राहिलेला नाही. ठरलेल्या वेळेतच या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी उस्मानाबाद येथे दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री अमित देशमुख हे सोमवारी सायंकाळी बैठकीसाठी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय परीक्षा या लवकरच आणि ठरलेल्या वेळेतच घेणार आहोत. त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्याची अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे. आगामी वर्षापासूनच येथे हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेतच सुमारे १० हेक्टर ८१ आर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध झालेली असून, महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने पदांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणेने येथील व्यवस्था पूर्ण कराव्यात, अशी सूचना करतानाच, उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून चांगले डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची उपस्थिती होती.