उमरगा : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा तसेच श्री तुळजाभवानी साखर कारखाना चालू करणे व जिल्हा मध्यवर्ती बँकेला ऊर्जितावस्था देण्याबाबत दिल्ली येथे खासदार शरद पवार यांच्यासमवेत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी प्रामुख्याने जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणी तसेच तेरणा व तुळजाभवानी कारखान्याची शासनाकडून येणे असलेल्या थकहमीच्या रकमेविषयी व दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, आ. कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे, अभय चालुक्य उपस्थित होते.
या भेटीमध्ये मुख्यतः भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून होणाऱ्या अडवणुकीच्या संदर्भात व जिल्हा बँकेस येणे असलेल्या शासकीय थकहमी रकमेबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रक्रियेसाठी दिल्ली येथे संबंधित खात्याचे कामगार श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शरद पवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून मार्ग काढण्याबद्दल सुचविले होते. यानुसार या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय कामगार श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांचीही भेट घेतली. गंगवार यांनी संबंधित अधिकाऱ्यास यावर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न असलेला तेरणा व तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेलादेखील ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे.