मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली आहे. याची दखल घेत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी गावास भेट देऊन पोलीस प्रशासन अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच तपासाची गती वाढवून याचा छडा लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांंना केल्या.
यावेळी चोरी झालेले गंगाधर ढवळे, नारायण मते यांच्या घरी जाऊन खासदार, आमदार यांनी विचारपूस करीत घटना समजून घेतली. तसेच ‘काळजी करू नका, पोलीस गुन्हेगारांना पकडून तुमच्या वस्तू, पैसा मिळवून देतील’, असा धीर दिला. पोलीस प्रशासनाला जलद गतीने तपास करा, अशा सूचनाही केल्या. गावात पुन्हा चोरीचे प्रकार घडू नये यासाठी ग्रामसुरक्षा रक्षक दलाची स्थापना करावी. ग्रामस्थांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या लोकप्रतिनिधींनी यावेळी केले.
यावेळी आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक घाडगे, येरमाळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश मुंडे, सहाय्यक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, सरपंच चरणेश्वर पाटील, पोपट पाटील, बाबासाहेब भातलवंडे, सुरेश मते, उपसरपंच अभिनंदन मते, माजी उपसरपंच बालाजी मते, समाधान मते, महादेव कांबळे, सुरेश मते, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.