उमरगा : मागील तीन चार दिवसापासून उमरगा शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून, पारा ४० अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारी अंगाची लाहीलाही होत असल्याने उकाड्यापासून बचाव करण्यासाठी एसी, कुलर, पंख्यांची मागणी वाढली आहे. शिवाय, थंड पेयाच्या दुकानावर देखील गर्दी दिसत आहे.
१५ दिवसापूर्वी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने पारा काही
अंशाने घसरला होता. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. मागील तीन दिवसापासून तर उमरगा शहरात प्रचंड उन्ह तापत आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चांगलेच चटके जाणवायला सुरूवात होत आहे. मागील काही
वर्षातील तापमानाचा आढावा घेतल्यास यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान ४० अंशापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे
यंदा प्रचंड तापमान राहण्याची शक्यता आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आता आपल्या घरातले कुलर वापरास काढले असून, कुलरची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरात शीतपेयांच्या दुकानातही गर्दी वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध साहित्यांचा ही वापर केला जात आहे.
शीतपेयांच्या दुकानावर वाढली गर्दी
काही दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण व शहरी भागात शीतपेयांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्याने थंडावा मिळण्यासाठी नागरिक शीतपेयांच्या दुकानावर जात आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे बाहेर जाताना मास्क आवश्यक असल्याने अनेक नागरिकांनी कॉटनचा दुपट्टा, टॉवेल वापरणे सुरू केले आहे. उन्हापासून संरक्षण होत असल्याने दुपट्टा व टॉवेलला चांगली मागणी आहे. सोबतच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत.