कळंब : प्रशासन हेच मायबाप सरकार असल्याची भावना कळंब येथील शासकीय कोविड सेंटरवर उपचार घेऊन ठणठणीत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पाठविलेल्या संदेशात व्यक्त केली आहे. यामुळे शासकीय कोविड सेंटरवर झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बळ मिळाले आहे.
परवा कळंब येथील दुसऱ्या एका कोविड सेंटरवरील डॉक्टरांनी मद्यपान करून ड्युटी केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे शासकीय कोविड सेंटरच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या चर्चा सुरू असतानाच कळंब येथील मोहेकर वसतिगृहावरील कोविड केअर केंद्रावरील एकूण व्यवस्थापनावर खुद्द रुग्णाच्या नातेवाइकांनीच समाधान व्यक्त करणारा मेसेज थेट जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या नावे पाठविल्याने शासकीय कोविड उपचार केंद्रावरील व्यवस्थेविषयी नावे ठेवणाऱ्यांना चपराक बसली आहे.
पुणे येथे अभियंता असलेल्या एका गृहस्थांच्या नातेवाइकांनी बाहेरगावी जावयाचे असल्याने कोविड चाचणी केली. ती पाॅझिटिव्ह आली. त्या सर्वांना कळंब येथील मोहेकर वसतिगृहावर उपचारासाठी दाखल केले. शासकीय यंत्रणांची ओळख ही काम न करणारी मंडळी अशी पाहावयाला मिळते. त्यामध्ये तथ्यही असेल. परंतु, या शासकीय कोविड सेंटरवर मिळालेली रुग्णसेवा ही ओळख पुसण्यास साहाय्यभूत ठरणारी आहे.
या उपचार केंद्रावर कोणत्याही रुग्णांना आपण वेगळे पडलो आहोत याची जाणीव होऊ दिली जात नाही. उलट त्याची सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. डॉक्टर मंडळी प्रत्येक रुग्णांकडे वैयक्तिक लक्ष देतात. कोणाची प्रकृती खालावत असेल तर त्याला आधार देणे व वेळ न दवडता पुढील उपचारासाठी पाठविणे, नातेवाइकांना वैयक्तिक संपर्क करून धीर देण्याचे कामही ते करतात.
चांगले, योग्य प्रमाणात पौष्टिक जेवण तर दिले जातेच, परंतु साफसफाई, स्वच्छता यावरही विशेष लक्ष दिले जाते. नर्स, वॉर्डबॉय हेही आपुलकीने सेवा करीत असल्याचा अनुभव आपल्या नातेवाइकांना आला. एकीकडे पुण्यात खासगी वैद्यकीय सेवेचा लाखो रुपये खर्चून आलेला अनुभव सांगण्यासारखा नसताना कळंब सारख्या ग्रामीण भागातील शासकीय कोविड सेंटरवरील अनुभव नक्कीच वेगळा आणि समाधाकारक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
चौकट -
हे टीमवर्कचे फलित...
शासकीय कोविड सेंटरवरील प्रत्येक रुग्ण ठणठणीत बरा होऊन जावा, असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असतो. मोहेकर वसतिगृहावरील केंद्र समन्वयक डॉ. अभिजित लोंढे, डॉ. अश्विनी जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव तसेच तेथील कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. त्या सर्वांच्या प्रयत्नाने हे केंद्र चांगली सेवा देऊन कौतुकास पात्र ठरत असतील तर ती नक्कीच चांगली बाब असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले.