उमरगा : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमरगा येथील आमदार प्रवीण स्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करीत पराभूत उमेदवार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या अनुषंगाने आमदार स्वामी यांना खंडपीठाकडून मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन टर्म आमदार राहिलेले शिंदेसेनेचे उपनेते ज्ञानराज चाैगुले यांना ठाकरे गटाच्या नवख्या प्रवीण स्वामी यांच्याकडून काठावर पराभव पाहावा लागला. यानंतर सुरुवातीला चौगुले यांनी धाराशिव येथील जात पडताळणी समितीकडे आमदार स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राविषयी तक्रार केली होती. मात्र, समितीने सुनावणीचे अधिकार नसल्याचे कारण देत ही तक्रार फेटाळली. यानंतर आता चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या अनुषंगाने खंडपीठाने जात पडताळणी समिती धाराशिव व आमदार प्रवीण स्वामी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने ॲड. एस. एस. गंगाखेडकर हे काम पाहात आहेत.
पुरावे सादर करण्याच्या सूचनामाजी आमदार चौगुले यांनी केलेल्या याचिकेवर खंडपीठाकडून आमदार स्वामी तसेच धाराशिवच्या जात पडताळणी समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. यातून पुरावे सादर करण्याच्या सूचना खंडपीठाने केल्या आहेत.
आजोबांच्या टीसीवर लिंगायत?आमदार प्रवीण स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे मालाजंगम जातीचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या आधारेच त्यांनी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, याचिकाकर्ते माजी आमदार चौगुले यांच्या दाव्यानुसार स्वामी यांच्या आजोबांच्या टीसीवर जातीचा उल्लेख लिंगायत आहे. त्यामुळे आमदार स्वामी यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आम्ही जिंकूमाझ्या जात प्रमाणपत्राची वैधता विभागीय जात पडताळणी समितीने केलेली आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करूनच निवडणूक लढवली. न्यायालयाच्या या लढाईतही आम्ही जिंकू, अशी अपेक्षा आहे. त्यांनी पराभव मान्य करावा.-आमदार प्रवीण स्वामी, उमरगा