उमरगा : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी सध्या अंतर्गत मशागतीची व इतर पेरणीपूर्व कामे पूर्ण करून पेरणीसाठी लागणारे साहित्य, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आ. ज्ञानराज चौगुले यांनी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्यासमवेत बैठक घेऊन, शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.
कृषी निविष्ठाधारकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाणे व खते अधिकच्या दराने विकण्याचा प्रकार घडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही आ. चौगुले यांनी यावेळी केल्या. बैठकीत कृषी निविष्ठाधारकांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे मागणीपेक्षा कमी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आ. चौगुले यांनी राज्य बियाणे महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना लेखी पत्र देऊन, दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकचे बियाणे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे सचिव लक्ष्मीकांत माणिकवार, शिवसेना विधानसभा संघटक शरद पवार, शेतकरी प्रतिनिधी शरद इंगळे आदी उपस्थित होते.