उस्मानाबाद - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत प्रवेश करत आहे. यातच सर्वाधिक चर्चा राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील आणि आमदारा राणा जगजितसिंह पाटील यांची होती. अखेर आज कार्यकर्ता मेळावा घेऊन राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.
मात्र आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात वाजलेल्या गाण्यातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ते गाणं म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेचं प्रचार गीत म्हणून प्रकाशित केलं होतं. गायक स्वप्निल बांदोडकर, अवधुत गुप्ते यांनी गायलेलं हे गाणं तुमच्या राजाला साथ द्या, हे प्रचंड व्हायरल झालेलं गाणं आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी मनसेने हे गाणं लॉन्च केलं होतं. हेच गाण आज राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाजवून कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
चार दशकांहून अधिक काळ शरद पवार यांच्यासोबत राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारीही त्यांच्यासमवेत मंचावर उपस्थित होते. प्रारंभी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आ. राणा पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, उस्मानाबादसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी काय केलं, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही़ मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे. कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी अजून मिळाले नाही. कौडगाव एमआयडीसीत उद्योग आले नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ झाली. देश एकिकडे ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात असताना, उस्मानाबाद यात मागे राहू नये, म्हणून काळजावर दगड ठेवत हा पक्षांतराचा निर्णय घेत असल्याचे सांगून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी डॉ. पद्मसिंह पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते. अखेरीस त्यांनी पुत्र राणा पाटील व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयास आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले.