कळंब (उस्मानाबाद) : पोळा सणांस खर पाहिला तर बैलांचा मान, पण वरचेवर दावणीच्या बैलांची संख्या तशी घटतच चालली अन् शेत शिवारात ट्रॅक्टरच्या वापर वाढला. यातूनच भाटशिरपुरा गावात शुक्रवारी पोळ्याच्या निमित्तानं आहे त्या बैलजोडीसह तब्बल पन्नास ट्रॅक्टरची मिरवणूक काढत पोळा साजरा करण्यात आला.
शेतात नांगरटी, मोगडणी, पेरणी, रासनी, कोळपणी अशा विविध कामात आजवर बैल राब राबत आले आहेत. अलिकडे मात्र शेतीमध्ये ट्रक्टर व ट्रक्टरचलीत यंत्राचा शिरकाव झाला. बैल जोपासणीस अपुरे पडणारे मनुष्यबळ, चार्याचा अभाव, जोड्यांची लाखमोलाची किंमत अशा विविध कारणांमुळे बैलांच्या कमी झालेल्या संख्येनेच अशाप्रकारे वावरात ट्रॅक्टरचं महत्व वाढलेलं आहे.
यास्थितीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या पोळ्याच्या सणातही बैलांची कमी झालेली संख्या प्रकर्षाने जाणवत आहे. यातूनच कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी आहे त्या बैलजोडींचे पुजन तर केलेच शिवाय शेतीच्या कामास पडणार्या ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढली.
सजवलेल्या पन्नास ट्रॅक्टरची मिरवणूक...यावेळी गावातील सर्व पन्नास ट्रक्टर धुवून, सजवून गावच्या जि. प. शाळेच्या मैदानावर एकत्र आणली गेली. यानंतर लयबद्ध मार्गस्थ होत गावातील प्रमूख रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आपापल्या घराच्या दारात पोहचल्यानंतर त्यांचे पुजन करण्यात आले असे उपसरपंच सुर्यकांत खापे यांनी सांगितले.