उमरगा (उस्मानाबाद ) : उमरगा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा, शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भीक मागत महावितरणला वीजबिलाचे पैसे देऊन गांधीगिरी केली़
शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत उमरगा तालुक्याचा समावेश झालेला नाही़ त्यातच महावितरणकडून थकीत वीजबिलाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे़ भारनियमनही सुरू असून, याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ उमरगा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, थकीत वीजबिलामुळे शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, नवीन डीपीचा प्रस्ताव प्रलंबीत ठेवू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले़ यावेळी महावितरणच्या नावाने भीक मागत जमा झालेले पैसे वीज बिलापोटी म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले़ यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा़ सुरेश बिराजदा, तालुकाध्यक्ष संजय पवार यांच्यासहपदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़