भूम (जिल्हा धाराशिव) : तालुक्यातील ईट येथील जिजाऊ माॅसाहेब मल्टिस्टेटमध्ये शेतकरी, शेतमजूर, व्यापारी ग्राहकांचे काेट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे या मल्टिस्टेटची एसआयटी, तसेच ईडी चाैकशी करून गुन्हे नाेंदवावेत, या प्रमुख मागणीसाठी ग्राहकांनी शुक्रवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन केले.
ईट येथे साधारणपणे बारा वर्षांपूर्वी जिजाऊ माॅसाहेब मल्टिस्टेट बँक सुरू झाली हाेती. या बँकेत ईटसह चांदवड, घाटनांदूर, पखरूड, डाेकेवाडी, नागेवाडी आदी गावांतील शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱ्यांची खाती, तसेच ठेवी हाेत्या. परिसरातील ग्राहकांचे काेट्यवधी रुपये अडकले आहेत. अनेक खातेदारांचे साेयाबीनचे पैसे आहेत. खरेदीदार व कंपनीचे संगनमत हाेते. त्यामुळेच खासकरून शेतकरी ग्राहकांची फसवणूक झाली, असा आराेप करीत ठेवीदारांनी शुक्रवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन केले. संबंधित कंपनी आणि बँकेची एसआयटी, ईडी चाैकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदाेनकर्त्या ठेवीदारांनी केली.