मराठवाड्याच्या साखर कारखानदारीत आपले वैभव सिद्ध केलेला तेरणा कारखाना मागील तेरा वर्षांपासून बंद आहे. यामुळेच तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी विविध अडचणी येत आहेत. खासगी कारखाने सहकारी कारखान्याच्या तुलनेत भाव कमी देत आहेत. आपल्या हक्काचा आणि आपल्या मालकीचा कारखाना बंद असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस गाळप होतो की नाही या भीतीपोटी उसाची लागवडच केली नाही, तर अनेक कामगारांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले. शिवाय, कारखाना बंद असल्याने ढोकीची आर्थिक प्रगतीच खुंटली आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने कर्जाच्या थकहमीतून ३० कोटी रुपये उपलब्ध करून जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्ग करावे, बँकेच्या अवसायकाच्या निगराणीखाली निविदा काढून कारखाना दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देऊन येणाऱ्या हंगामात सुरू करावा, ही मागणी शेतकरी व सभासदांकडून केली जात आहे. याच मागणीच्या समर्थनार्थ तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. ढोकी येथील हनुमान चौकातून निघालेला हा मोर्चा बसस्थानकमार्गे बालाजीनगर 'पेट्रोल पंप चौकमार्गे कारखाना स्थळावर धडकला. कारखाना गेटवर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी दत्तात्रय देशमुख म्हणाले, मागील तेरा वर्षांपासून या भागातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक विकास थांबला आहे. सरकारने मोठमोठ्या उद्योग-व्यवसायांना मदत केली. त्यांचे वीजबिल माफ केले, व्याज माफ केले. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी मदत केली नाही. सरकारने तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी कोरोनात जितकी माणसे मेली नाहीत, तेवढी माणसे हा कारखाना बंद असल्याने मेल्याचा दावा देशमुख यांनी केला. यावेळी अजित खोत, निहाल काझी, सतीश देशमुख, संग्राम देशमुख, लक्ष्मण सरडे, शिवाजीराव देशमुख, सतीश वाकुरे, अमोल समुद्रे, सुशील गडकर, गफार काझी यांचीही भाषणे झाली.
बाजारपेठ बंद ठेवून समर्थन...
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ढोकी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्यापारीवर्ग आंदोलनात सहभागी झाला होता. तसेच आंदोलनात महिला बचत गटातील २००हून अधिक महिलाही सहभागी झाल्या होत्या. कारखान्याच्या गेटवर आंदोलनस्थळी या महिलासह शेतकरी, शेतमजूर, कामगार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाचे स्वरूप बदलले...
जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही, तोपर्यंत गटनिहाय कारखाना गेटवर आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, कोरोनामुळे या आंदोलनाचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. मात्र, जोपर्यंत तेरणा चालू होत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मार्गाने कोरोनाच्या नियम व अटीचा पालन करीत लढा सुरूच ठेवण्यात येईल, असे संघर्ष समितीच्या वतीने कळविण्यात आले.