नळदुर्ग : शहरातील चावडी चौक ते मराठा गल्ली या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी रस्त्यावरील खड्ड्यांत जागोजागी बेशरमाची लागवड करीत रहिवाशांनी सोमवारी नगर परिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
मराठा गल्लीतील रस्त्याची दुरवस्था झालेली असून, आबालवृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे तत्काळ रस्ता दुरुस्ती व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मराठा गल्लीतील रहिवाशांनी नगरपालिकेकडे केली होती. या संदर्भात पालिकेने रहिवाशांना तांत्रिक व कायदेशीर बाबीची पूर्तता करून लवकरच रस्त्याचे काम व अन्य सुविधा देऊ, अशी लेखी हमी दिली होती. परंतु, यावर समाधान न झाल्याने नागरिकांनी सोमवारी मराठा गल्ली ते चावडी चौक दरम्यानच्या रस्त्यावर बेशरमांची लागवड करून पालिकेचा निषेध केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मराठा गल्लीतून हालगीच्या वाद्यात निषेध फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत व खड्ड्यात बेशरमांची झाडे लावत मोर्चास सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोर्चा चावडी चौकात पोहोचला. यादरम्यान बेशरमांची ११ झाडे लावून संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.
आंदोलनात शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, श्रीकांत सावंत, निखिल येडगे, संतोष मुळे, विजयानंद जाधव, युवराज जगताप, मनोहर जाधव, बाबूराव सुरवसे, सुरेश हजारे, शिवाजी चौधरी, तानाजी सावंत, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सुहास येडगे, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, राजेंद्र महाबोले, उमेश जाधव, गणेश मोरडे, शिवाजी सुरवसे, नितीन दळवी, कुरूक्षेत्र किल्लेदार, रतिकांत नागणे, संतोष किल्लेदार, धनाजी किल्लेदार, ज्ञानेश्वर मुळे, सहदेव जगताप, अविनाश जाधव, दादा काळे, संभाजी येडगे, नेताजी जाधव, सोमनाथ पवार, सुनील गव्हाणे, गोटू नागणे, प्रकाश जाधव, प्रदीप चौधरी, राजेंद्र किल्लेदार, मनोज जाधव, बालाजी किल्लेदार, तात्याराव जाधव, गोविंद जाधव, अमित नागणे, धनाजी जाधव, विनोद डोंगरे, तानाजी जाधव, अभिषेक सावंत, विमलाबाई काळे यांच्यासह शिवशाही तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.