कळंब : पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा व मागासवर्गीयांवर अन्याय करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी करीत भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काेविड नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्यात आले.
मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. असे असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या उपसमितीने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातील अधिकारी, कर्मचारी वर्गातून निषेध केला जात आहे. गुरुवारी भाजपाच्या अनुसूचित जाती- जमाती माेर्चाच्या वतीने कळंब येथे काेविड नियमांचे पालन करीत निदर्शने करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता, राज्य सरकारने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सतपाल बनसाेडे यांनी केली. यावेळी तालुका सरचिटणीस संजय जाधवर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, तालुकाध्यक्ष आबासाहेब रणदिवे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.