ढाेकी (जि. उस्मानाबाद) - ढाेकीसह परिसरातील गावांतील शेतकरी, व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही विजेच्या लपंडावाला सामाेरे जावे लागत आहे. दिवसभरात पंधरा ते वीस वेळा वीज खंडित हाेत आहे. वेळाेवेळी पाठपुरावा करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. जोमात आलेले सोयाबीनचे पीक पाण्याअभावी काेमेजून चालले आहे. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत आहेत. विहीर, बाेअरला बऱ्यापैकी पाणीही आहे. परंतु, वीजपुरवठा सुरळीत हाेत नाही. एकेका दिवसात पंधरा ते वीस वेळा वीज खंडित हाेत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी मागील काही दिवसांपासून महावितरणकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेतकऱ्यांसाेबतच खंडित वीजपुरवठ्याचा विद्यार्थ्यांनाही फटका साेसावा लागत आहे. काेविडमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण मदार ऑनलाइन शिक्षणावर आहे. यासाठी माेबाइलची गरज असते. हे माेबाइल शंभर टक्के चार्ज हाेतील, एवढा वेळही वीज मिळत नाही. साेबतच व्यापारीवर्गही हैराण झाला आहे. महावितरणच्या या कारभाराविराेधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी ढाेकी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. या वेळी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, शिवसेना विभागप्रमुख गुणवंत देशमुख, युवक तालुका अध्यक्ष शाकेर शेख, विकास देशपांडे, शाखाप्रमुख संतोष कंदले, गणप्रमुख महेश तिवारी, कक्षप्रमुख दत्ता साळुंखे, पंकज देशपांडे, समीर शेख, पवन कोळी, शेतकरी बाबा कोकाटे, मुसा शेख, अनिल कोकाटे, पाशा वस्ताद, राजपाल देशमुख, राजू पठाण, धनंजय शिंदे, फजल शेख, पांडुरंग माळी, रब्बानी कोतवाल, अंकुश देशमुख, योगेश देशमुख, अमोल तिवारी, अमर देशमुख आदींची उपस्थिती हाेती. या वेळी उपकार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे, ढाेकी सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता श्रुती चाैरागडे यांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरले.
काेट...
विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत होईल...
ढोकी येथे असलेल्या ३३ केव्हीए सबस्टेशनवर अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे अतिरिक्त ट्रान्सफाॅर्मरची गरज आहे. लवकरच नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. यानंतर ढाेकीसह परिसराचा वीजपुरवठा सुरळीत हाेईल.
- श्रुती चौरागडे, कनिष्ठ अभियंता, ढोकी