उमरगा : महाराष्ट्र शासनमान्य एमटीएस राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उमरग्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखली असून, येथील दुसरीच्या वर्गातील संचिता चुंगे राज्यात द्वितीय आली आहे.
कोरोनामुळे या वर्षी दुसरी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा परीक्षा २५ जुलै २०२१ रोजी ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेत उमरगा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात. गेल्या दहा वर्षांपासून एमटीएस परीक्षेत या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करून उमरगा पॅटर्न निर्माण केला आहे. आजवर संकेत साळुंके, प्रणिता मोरे, चाणक्य बावा, श्रेयश आळंगेकर, पृथ्वीराज फुकटे, सुयश काळे हे विद्यार्थी राज्यात प्रथम, द्वितीय आलेले आहेत. या वर्षी संचिता चुंगे या विद्यार्थिनीने दुसऱ्या एमटीएस परीक्षेत राज्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. संचिताने २०० पैकी १९२ गुण मिळविले आहेत.
दरवर्षी उमरगा तालुक्यातून ५० ते ६० विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवितात. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. ओएमआर उत्तरपत्रिका कशी असते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लहान वयात अभ्यास कसा करावा. अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि बुद्धिमत्ता विषयातील कौशल्यावर विद्यार्थ्यांना प्रभुत्व मिळविता येते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची पाचवी स्कॉलरशिप व आठवी स्कॉलरशिपची पूर्वतयारी होत असल्याने पालकांमधूनही या परीक्षेसाठी चांगला प्रतिसाद आहे.
यांनीही मारली बाजी
कोरोनाकाळात शाळा बंद असूनही तालुक्यातील अडीचशे विद्यार्थी या परीक्षांसाठी बसले होते. यात दुसरीमधून संचिता चुंगे राज्यात दुसरी आली आहे. प्राची धनराज कुडकले ही तिसरीमधून जिल्ह्यात प्रथम, तर अर्णव तोडकर या विद्यार्थ्याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तेजस्विनी बळिराम क्षीरसागर, यशराज गडदे आणि अन्वी भुसार (चौथी), तहीनियात शेख, प्रसाद तंगशेट्टी (सहावी), तर उमादेवी बुलबुले व आदित्य मुसांडे (सातवी) यांनीही जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. एमटीएस स्पर्धा परीक्षेचे तालुका समन्वयक पद्माकर मोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.