भूम : नगरपरिषदेकडून शहराला फिल्टर पाणी पुरविले जात असल्याचा दावा केला जात असतानाच दुसरीकडे मागील आठ दिवसापासून चक्क गढूळ पाणीपुरवठा हाेत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून निवेदनाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
भूमनगर पालिकेकडून शहराला शुद्ध व फिल्टर पाणी पुरविण्यात येत असल्याचा दावा नगरपालिकेकडून नेहमी केला जाताे. परंतु, हा दावा आता कुठेतरी फाेल ठरताना दिसत आहे. तसा आराेप राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून करण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून शहरामध्ये अस्वच्छ व गढूळ पाणी पुरविले जात आहे. या अनुषंगाने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाकडून अद्याप कुठल्याच स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. तरीही आजघडीला दाेन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपट्टी मात्र वर्षातील सर्व ३६० दिवसांची घेतली जात आहे, असे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रश्नाकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष विनोद नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मस्कर, सिद्धेश्वर शेलार, आबासाहेब मस्कर, गणेश साठे, जावेद मोगल, बालाजी सावंत, उमेश रेवडकर , रमेश आरगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.