कळंब : शहरवासीयांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे काम न. प.ने हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या वैभवात तसेच सोयी-सुविधांमध्येही आणखी भर पडणार असल्याने शहरवासीयांत समाधान व्यक्त केले जात आहे.
कळंब शहरात न.प. ने जवळपास २५ वर्षांपूर्वी सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह उभारले होते. मात्र, त्याचा नीटसा वापर झाला नाही. त्यामुळे ते दुर्लक्षित राहिले. त्या सभागृहाचे बांधकाम करताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम तेथे घेता येत नव्हते. परिणामी ते सभागृह पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरले होते. ते सभागृह असूनही त्याचा वापर करता येत नसल्याने ३१ ऑगस्ट २०१९ रोजी न. प. च्या सर्वसाधारण सभेत शहरात एक सर्वसोयींनीयुक्त सभागृह असावे, असा ठराव सत्ताधारी मंडळींच्या पुढाकाराने संमत करण्यात आला. नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी याबाबत प्रशासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यासाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळवली. यामध्येही अनेक अडचणी आल्या, काहींनी खोडाही घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मागे न. प. वर्तुळात होती. मात्र आता काम मार्गी लागल्याने शहरवासीयांत समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरात हे बहुउद्देशीय सभागृह उभे राहत आहे. यामुळे शहरवासीयांना सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच वैयक्तिक कार्यक्रम आयोजनासाठी आता हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.
चौकट -
कशी असेल रचना
या इमारतीमध्ये एक मोठा फंक्शन हॉल, स्वच्छतागृहासह जोडलेल्या असलेल्या राहण्यासाठी १८ खोल्या, जेवणासाठी दोन मोठे हॉल, पाठीमागील बाजूस बगीचा असणार आहे. पुढील बाजूला पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. ही इमारत खाजगी मंगल कार्यालयाच्या सर्व सुविधा पुरविणारी बनवण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. या इमारतीसाठी जवळपास ९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. काम विनाखंड चालू राहिले तर वर्ष-दीड वर्षात ही इमारत तयार होईल, असा अंदाज आहे.
कोट....
कळंब शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे होईल यासाठी या बहुउद्देशीय इमारतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. घरात एखादे कार्य असेल तर ते करायचे कोठे, असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. खाजगी कार्यालये करण्याची अनेकांची ऐपत नसते, त्यासाठी ही इमारत पर्याय असेल.
- सुवर्णा मुंडे, नगराध्यक्षा
चौकट -
शहरात सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात सर्व सोयींनीयुक्त मंगल कार्यालय उपलब्ध व्हावे, शहरवासीयांची सांस्कृतिक भूक भागावी यासाठी एक सांस्कृतिक भवन असावे, अशी आमची संकल्पना होती. या इमारतीच्या माध्यमातून ती पूर्ण होते आहे, याचे समाधान आहे. ही इमारत जिल्ह्यातील सर्वात लक्षणीय इमारत असेल.
- संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष