तामलवाडी (जिल्हा : धाराशिव) : तुळजापूर शहरात येथील स्थानिक हस्तकांच्या माध्यमातून ड्रग्स पुरवठा करणाऱ्या मुंबईतील एका महिलेस तामलवाडी पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. तिला रात्री उशिरा ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
तुळजापूर शहर तसेच काही ग्रामीण भागातही ड्रग्स विक्री सुरू होती. काही दिवसापूर्वीच तामलवाडी पोलिसांनी तीन आरोपींना ड्रग्ससह गजाआड केले होते. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार सखोल तपास केल्यानंतर या आरोपींना मुंबई येथून एक महिला ड्रग्स पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी पोलिस पथक मुंबईला रवाना केले. या पथकाने रविवारी आरोपी महिला संगीता गोले हिला बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा तामलवाडी ठाण्यात तिला हजर करण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून रात्रीच या महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता तिला ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.