उमरगा (उस्मानाबाद ) : उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी बसव प्रतिष्ठाणच्या वतीने आज तालुक्यातील केसर जवळगा येथून तहसील कार्यालयापर्यंत जन परिवर्तन क्रांती यात्रा काढण्यात आली़ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी मुंडण करून अर्धनग्न अवस्थेत यात्रेस सुरूवात केली़
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून उमरगा तालुक्याला वगळण्यात आले आहे़ उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना मदत करावी, यासह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी प्रशासनामार्फत शासनाला निवेदन दिले होते़ मागण्या मान्य न झाल्याने सोमवारी सकाळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी केसरजवळगा येथे शासनाच्या निषेधार्थ स्वत:चे मुंडण करून घेतले़ अर्धनग्न अवस्थेत केसर जवळगा येथून जन परिवर्तन क्रांती यात्रेस सुरूवात करण्यात आली़ आलूर, बेळंब, कोथळी, मुरूम, येणेगूर, येळी, जकेकूर आदी गावातून ही यात्रा काढत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला़
दुपारी उमरगा येथील तहसील कार्यालयासमोर शासन विरोधी घोषणाबाजी करण्यात आली़ तहसीलच्या पाय-यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले़ मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले़ यावेळी केसरजवळगा येथील माजी सरपंच श्रीमंत भुरे, नागेश पाटील, निळकंठ कोटरगे, गिरीष पाटील, अभिजित घाळे, संतोष कलशेट्टी, सतीश मुदकण्णा, अजिज शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते़
तर तीव्र आंदोलन छेडूउमरगा तालुक्यातील एका मंडळातील पावसाची सरासरी जास्त आहे़ मात्र, संपूर्ण तालुक्यात जास्त पाऊस असल्याचे दाखवून तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत सामावून घ्यावे, शेतकरी, सर्वसामान्यांना मदत करावी, अन्यथा यापुढील काळात शासन विरोधी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी यावेळी दिला़