कळंब : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, आता नगरपरिषद प्रशासनाने महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरात विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, शिवाय याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयात रोज होणाऱ्या रॅपिड टेस्टमधून डझनावार लोक कोरोना पाॅझिटिव्ह येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाचा तुटवडा बघता ते तसेच निघून जातात अन् समुदायात स्वैर संचार करतात. याची गांभीर्याने दखल घेऊन नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे व रजेवर असणारे उपाध्यक्ष संजय मुंदडा यांनी उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीस वैद्यकीय अधिक्षक जीवन वायदंडे, डाॅ.स्वप्निल शिंदे, पालिका कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.वायदंडे यांनी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून उपाययोजना आराखडा मंजूर केला.
यानुसार, गुरुवारपासून कोरोना चाचणी म्हणजे रॅपिड व इतर टेस्ट या नगरपालिकेच्या पुनर्वसन सावरगाव मारुती मंदिराजवळील शाळा क्र. २ येथे करण्यात येईल. येथील कार्यालयासाठी असलेल्या खोलीत नाव नोंदणी व बाजूच्या खोलीत तपासणी होईल. मोठमोठ्या रूम व ऐसपैस परिसरामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यात यश येईल.
तसेच तेथे ४ पालिका कर्मचारी, २ महसूल कर्मचारी व २ पोलीस कर्मचारी अतिरिक्त तैनात असतील. हे कर्मचारी, अधिकारी यांचे पथक निगेटिव्ह लोकांना रवाना करून पॉझिटिव्ह लोकांना थोडा वेळासाठी थांबवून घेतील. त्या रुग्णांच्या गृहविलगीकरणाची योग्य सोय आहे का, याची प्रत्यक्षात खातरजमा करून पालिका आरोग्य विभागाची मान्यता लिखित स्वरूपात घेऊनच त्यांना घरी पाठवतील.
वाढती रुग्णसंख्या पाहता, पालिकेने हे पाऊल उचलले असून, याचबरोबर धनेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतापसिंह पाटील यांच्याशी संपर्क करून कोविड सेंटर चालू करण्याबाबत चर्चा झालेली आहे. दोन दिवसांत एकत्र बैठक होऊन नगरपालिका, धनेश्वरी शिक्षण संस्थेच्या सोबत याबाबत निश्चित योजना आखेल, अशी माहितीही नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे व उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली.
...तर घराला जाळी ठोकून बंद करणार
होम आयसोलेशन रुग्ण जर नियम मोडून १७ दिवसाआधी बाहेर दिसले, तर २ हजार रुपये दंड, कायदेशीर कारवाई अन् घरावर जाळी ठोकून त्यांना घरात बंद करण्यासाठी पालिकेचे स्वतंत्र पथक काम करेल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. ज्या रुग्णांना स्वतंत्र खासगी उपचार घेणे शक्य नसेल, त्यांना उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी औषधोपचार सांगतील व त्या रुग्णासोबत पालिकेच्या शिक्षकांचे पथक दैनंदिन संपर्क ठेवतील. जे रुग्ण अत्यवस्थ वाटतील, त्यांची कोविड सेंटरला रवानगी होईल. जे रुग्ण अत्यवस्थही नाहीत अन् होम आयसोलेशनचे समाधान करून प्रमाणपत्र प्राप्त करू शकणार नाहीत, अशा रुग्णांनाही सदरील शाळेच्या इतर पाच खोल्यांत राहण्याची व्यवस्थित सोय केली जाणार आहे.