कळंब (जि. उस्मानाबाद) : दुकानाजवळ थांबल्याचा जाब विचारल्यावर ‘रस्ता तुम्हारे बाप का है क्या’, असा प्रतिसवाल केल्याने एका कुटुंबातील आठजणांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून, गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कळंब शहरातील गांधीनगर भागात बुधवारी रात्री आरेफ ऊर्फ फेरोज ऊर्फ हुसेन आसिफ शेख (वय २६) व त्याचा मित्र महेबूब महंमद शेख (२६) हे दोघे राहुल धोकटे यांच्या दुकानाजवळ बोलत थांबले होते. तेव्हा तेथे आलेल्या कुणाल धोकटे याने त्यांना तुम्ही येथे का थांबलात, असे विचारणा करुन शिवीगाळ केली. तेव्हा महेबूब याने रस्ता तुम्हारे बाप का है क्या, असा प्रतिसवाल केला. यानंतर कुणाल हा दुकानाजवळ असलेल्या घरात गेला व त्याच्या कुटुंबातील राहुल धोकटे, विजय धोकटे यांना घेऊन आला. त्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने आरेफ व महेबूब यांना मारहाण केली. आरेफ याला पायावर, तर महेबूब याच्या डोक्यात मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. यादरम्यान, सुनील, संदीप, विलास, मयूर व ओमकार या धोकटे बंधूंनीही आरेफ व महेबूब यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. हा गोंधळ ऐकून तेथे आलेल्या ताहेर मोमीन, समीर मोमीन व इतरांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली. उपस्थितांनी लगेच जखमी आरेफ व महेबूब यांना कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना उस्मानाबादच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे महेबूब यास तपासले असता, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले; तर आरेफवर उपचार सुरू आहेत. याबाबत आरेफ शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल धोकटे, राहुल धोकटे, विजय धोकटे, सुनील धोकटे, संदीप धोकटे, विलास धोकटे, मयूर धोकटे, ओमकार धोकटे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करीत आहेत.