धाराशिव -परंडा बाजार समिती सभापती तसेच उपसभापती निवडीसाठी आज बैठक बाेलावण्यात आली हाेती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सहलीवर गेलेल्या ‘मविआ’च्या आठ संचालकांचे अपहरण झाल्याची परंड्यात धडकली. यानंतर दाेन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची हाेवून ते एकमेकांना भिडले. या संतप्त कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी उपस्थित पाेलिसांकडून साैम्य लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर परिस्थिती निवळली.
परंडा बाजार समितीत महाविकास आघाडीला १३ तर महायुतीला पाच जागेवर समाधान मानावे लागले. दगाफटका हाेवू नये, म्हणून महाविकास आघाडीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल माेटे यांनी आपले सदस्य सहलीवर धाडले हाेते. बुधवारी सभापती, उपसभापती निवडीसाठी बैठक बाेलावली असतानाच १३ पैकी आठ सदस्यांना गायब केल्याची वार्ता धडकली. असे असतानाच ‘‘बंदुकीचा धाक दाखवून काहींनी आमच्या सदस्यांना पळवून नेले’’, असा आराेप मविआचे ज्ञानेश्वर पाटील, राहुल माेटे यांनी केला.
ताेवर बाहेर दाेन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची हाेवून एकमेकांना भिडले. प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताबाहेर जावू नये, म्हणून पाेलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर साैम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे परंडा शहरामध्ये तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, शिंदे गटाचे माजी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी ‘मविआ’च्या नेत्यांनी केलेले आराेप फेटाळले. बाजार समितीत आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्जही भरले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.