(फोटो : बालाजी बिराजदार २१)
प्रभाग ५
बालाजी बिराजदार
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जेवळी रस्त्याचा भाग येत असून, यात सिमेंट रस्ते, गटारीची कामे झाली आहेत. परंतु, गावतळ्याच्या बाजूचा करण्यात आलेला सिमेंट रस्ता हा अरुंद केल्याने, या रस्त्यावरून एकेरीच वाहतूक करावी लागत असल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस लाईन, गावतळे, फावडे गल्ली, पाण्याच्या टाकीखालील झोपडपट्टी, फकीर प्लॉटिंग, आदी भाग येतो. हा प्रभाग एकसंध नसून एका रेषेत विखुरल्यासारखा आहे. या प्रभागात बसवेश्वर मंदिरासमोरील सिमेंट रस्ता, गावतळ्याच्या बाजूचा फावडे गल्ली सिमेंट रस्ता व एका बाजूने नाली, सूर्यवंशी, पाटील व भगवान मक्तेदार यांच्या घरासमोर सिमेंट रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे कामही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, अजून काही रस्ते व नाल्यांची कामे प्रभागात होणे बाकी आहेत. शिवाय, जुन्या पाण्याच्या टाकीखालील झोपडपट्टीत तर ना रस्ते झाले, ना गटारी. यामुळे रस्त्यावरच पाणी थांबत असल्याने याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच भागात रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्नही गंभीर आहे. परंतु, याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच गावतळ्याच्या बाजूचा रस्ता हा वर्दळीचा असून, नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यात शुक्रवारी आठवडी बाजारादिवशी तर अधिकच वर्दळ असते. हा करण्यात आलेला सिमेंट रस्ता अरुंद असून, येथून एखादे चारचाकी वाहन जात असेल तर समोरून दुचाकीस्वारालाही जाता येत नाही. त्यामुळे नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
कोट........
प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणुकीत नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून झाला आहे. या भागातील बसवेश्वर मंदिरासमोर रस्ता, फावडे गल्ली रस्ता, एका बाजूचा नाला, सूर्यवंशी, मक्तेदार घरासमोर सिमेंट रस्ता तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे कामही करण्यात आले आहे.
- निर्मला स्वामी, नगरसेविका
प्रभाग क्रमांक ५ मध्ये सिमेंट नाल्याची कामे झाली असली तरी पावसाळ्यात गावतलावातून वाहणाऱ्या पाण्याचा नाल्यातून व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. नगरपंचायतीने या प्रभागात पाणी व दिवाबत्ती यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तळ्याच्या बाजूचा रस्ता अरुंद झाल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
- वीरभद्र फावडे, रहिवासी
प्रभाग ५ मध्ये गेल्या पाच वर्षांत काहीही विकासकामे झालेली नाहीत. गावतळ्याच्या बाजूचा रस्ता ६६ फुटांचा असताना त्या ठिकाणी केवळ १० फुटांचा सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे. येथे एका बाजूने नाला केला असला तरी त्याचे काम दर्जेदार झालेले नाही. अंतर्गत गटबाजीमुळे व नगराध्यक्षपदाच्या अपेक्षेपोटी प्रभागाचा विकास खुंटलेला आहे.
- गौसीया युसूफ कुरेशी, रहिवासी
फोटो....
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील गावतळ्याच्या बाजूचा रस्ता असा अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.