उस्मानाबाद : कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा घेतला आहे़ दरम्यान, गुरुवारी उस्मानाबादेत बैठकीसाठी आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे आटोकाट प्रयत्न केले़ उस्मानाबाद शहराजवळ येताच राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या.
शेतक-यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नसल्याचा आरोप करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु केली आहेत़ २० तारखेच्या अल्टिमेटमनंतर जिल्ह्यात एकाही मंत्र्यांना फिरकू न देण्याचा निर्धार करीत आंदोलन तीव्र केले़ दरम्यान, गुरुवारी सकाळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीसाठी उस्मानाबाद दौ-यावर असल्याचे समजताच त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच अडविण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले़ त्याअनुषंगाने बुधवारीच बैठक घेवून लातूरहून येणा-या सर्व रस्त्यांवर कार्यकर्ते उतरविले़ मात्र, चंद्रकांत पाटील यांना प्रशासनाने नियोजित वेळेआधीच तुळजापूर मार्गे उस्मानाबादेत दाखल केले़. यावेळी पाटोदा चौरस्त्यावर राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या़ शासकीय विश्रामगृहावर बैठकीसाठी मंत्री पोहोचल्यानंतर तेथेही कार्यकर्त्यांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेरच त्यांना रोखून धरले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांच्यात चर्चा होवून त्यांच्या मागण्यांसदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांकडे बसून चर्चा करण्याचे निश्चित झाल्यानंतर आंदोलनाची धार सौम्य झाली़ स्वत: राणाजगजितसिंह यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्यातील चर्चेचा तपशील सांगितल्यानंतर आंदोलन निवळले़ बैठक संपल्यानंतर महसूलमंत्री व राणाजगजितसिंह एकाच वाहनाने सोलापूरकडे रवाना झाले़ यावेळी पोलिस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता.