ठाेंबरे यांची घाेषणा : डेअरीचा दशकपूर्ती साेहळा उत्साहात
कळंब - रांजणी येथील नॅचरल डेअरी विभागाच्यावतीने लवकरच अत्याधुनिक दूध भुकटी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घाेषणा संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठाेंबरे यांनी केली.
डेअरीच्या दशकपूर्ती साेहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वर काळदाते यांची उपस्थिती होती. ठाेंबरे यांनी साखर कारखान्याची २५० कोटी आणि नॅचरल डेअरीची १०० कोटींची वार्षिक उलाढाल असल्याचे नमूद करून महिन्यातील ४,१४ आणि २४ या तारखेस दूध उत्पादकाचे न चुकता होणारे पेमेंट, दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता हे यशाचे गमक असल्याचे सांगितले.
डेअरी विभागाच्या यशात दूध उत्पादकांबरोबरच दूध संकलक, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वितरक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी दूध संकलक, विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. डेअरीचा लेखाजोखा पांडुरंग आवाड यांनी मांडला तर श्रीपाद ठोंबरे यांनी आभार मानले. यावेळी डेअरीचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.