उस्मानाबाद : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या कुटुंबीयांनी उस्मानाबादनजीक बेकायदेशीर पद्धतीने सुमारे दीडशे एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीबाबतही चौकशी व्हावी, यासाठी ईडीकडे तक्रार करण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत असताना आता भाजपने उस्मानाबादेतील जमीन खरेदी प्रकरण पटलावर आणले आहे. २०१३ साली मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांच्यासह त्यांच्या मुली, मुलगा, जावई अशा सहा जणांनी उस्मानाबादजवळील आळणी व जवळा दु. शिवारातील १४९ एकर जमीन वसंतराव मुरकुटे व त्यांच्या कुटुंबाकडून २ कोटी ७ लाख रुपयांत विकत घेतली आहे. यापोटी त्यांनी शासनाला ८ लाख ४० हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले. दरम्यान, ज्या महिन्यात हा व्यवहार झाला, त्याच महिन्यात या एकूण जमिनीचे शासकीय व्हॅल्युएशन करून घेतले असता ते ३.२९ लाख रुपये इतके निघाले. अर्थात १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क मलिक कुटुंबीयांनी चुकविला असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला.
शिवाय, ही जमीन खरेदी करीत असताना बागायती होती, ती जिरायती दाखविण्यात आली. या शेतीत जवळपास ५५ लाख रुपयांचा बंगला असताना त्याची नोंद घेण्यात आली नाही. शेतजमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा खरेदीदारांनी दिला नाही. खरेदी करणारे सर्व जण एकाच घरात राहतात. शेती व घरकाम करतात. तेव्हा त्यांच्याकडे इतकी रक्कम आली कोठून? यामुळे यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार आम्ही केल्याने या जमिनीचा फेर दीर्घ काळ झाला नाही, असा दावाही काळे यांनी केला.
अधिकारी बदलून ओढून घेतला फेर...यावेळी ॲड. अनिल काळे म्हणाले, तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनाही हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी दोन वेळा चौकशी लावली होती. दोन्ही वेळा फेर न घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून तेथे एका उपजिल्हाधिकाऱ्याकडे प्रभार देण्यात आला व त्याच्या हातून या जमिनीचा फेर ओढून घेतल्याचा आरोप अनिल काळे यांनी केला. यासंदर्भात ईडीकडे लवकरच तक्रार करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी नितीन काळे, ॲड. अनिल काळे, ॲड. नितीन भोसले यांनी दिली.